ताजा कलम

शेतकऱ्यांचे साहित्य का नाही? अमर हबीब, आंबाजोगाई शेतीचा शोध लागण्या पूर्वी माणसाला फक्त अन्नाची भ्रांत होती. रानावनात भटकायचे. कंद-मुळे श...

Friday, 21 October 2022







शेतकऱ्यांचे साहित्य का नाही?

अमर हबीब, आंबाजोगाई



शेतीचा शोध लागण्या पूर्वी माणसाला फक्त अन्नाची भ्रांत होती. रानावनात भटकायचे. कंद-मुळे शोधायची, शिकार करायची आणि भूक भागवायची, यात तो व्यस्त असे. शेतीचा शोध लागला. अन्नाची भ्रांत मिटली. मानवी जीवनाला स्थैर्य प्राप्त झाले. शेतीघ्या शोधामुळे मानव जातीची जगण्याची पद्धत बदलून गेली. रानावनात भटकणारी माणसे वसाहती करु लागली. नवनव्या वस्तू निर्माण होऊ लागल्या. त्यांची एकमेकांशी देवणघेवाण सुरु झाली. या प्रक्रियेत भाषेचा विकास झाला. त्यातून साहित्य जन्माला आले. अन्नाची भ्रांत मिटल्या नंतरच भाषा, साहित्य, कला आदींच्या विकासाला चालना मिळाली. सर्व कला व साहित्याच्या तळाशी शेतीतून निर्माण होणारे अतिरिक्त अन्न आहे. त्याला वगळले तर कोणत्याच प्रकारचे साहित्य निर्माण होऊ शकत नाही. शेतकरी शेतीत राबला, त्याने घाम गाळला आणि तुमच्या अन्नाची तजवीज केली म्हणून तुम्ही निवांतपणे साहित्याची निर्मिती करु शकलात. या विषयी साहित्यिकांनी शेतकर्‍यांविषयी जो कृतज्ञताभाव ठेवायला हवा होता, तो ठेवला नाही. उलट राबणे त्याचा धर्म आहे व त्याने पिकविलेले फुकट खाणे आमचा अधिकार आहे, अशी समजूत करून घेतली. साहित्यिकांनी शेतकर्‍यांशी नाड जोडण्या ऐवजी शेतकर्‍यांना लुटणार्या राजा-राजवाड्यात वावरणे पसंत केले. राजे आणि त्यांच्या दरबार्‍यांना रिझविण्यासाठी आपली सारी प्रतिभा खर्ची घातली. संवेदनशीलता देखील कशी पक्षपात करते, हे प्रतिभावंतांच्या वर्तनाकडे पाहिले की लक्षात येते.



साहित्यात शेतकर्‍यांचे जे चित्रण आले आहे, ते ढोबळमानाने तीन गटात विभागता येईल. 1) कृषी जीवनाचे उदात्तीकरण करणारे 2) शेतकर्‍यांचे विदुषकीकरण करणारे 3) शेतकर्‍यांना खलनायक म्हणून रेखाटणारे.



कृषी जीवन ही आदर्श संस्कृती आहे. ती सर्वश्रेष्ठ जीवनशैली आहे, असा दावा करून काही लोकांनी ग्रामीण जीवन रेखाटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रसभरीत निसर्ग वर्णने केली. जोंधळ्याला लटकलेले चांदणे दिसणे काय किंवा हिरवे सपान पाहणे काय सारखेच. शेतकर्यांचे दु:ख या वर्गाला उमगले नाही.

या वर्गातील साहित्यीकांनी केलेले चित्रण कैद्याने तुरुंगाचे बहारदार वर्णन करावे, तसे हास्यास्पद झाले आहे. एखादा कैदी म्हणाला की, “पहा त्या उंच भिंती, मनोरे आकाशाला भिडणारे, बलदंड गज, साखळदंड गजालाही वाकविता न येणारे. घोर अंधार, खोलीतील एकांत कोण्या साधूला ना मिळे, आमचे जेवण असे, राजाच्याही नशिबी नसणारे.”



अनिछेने शेती करावी लागणे म्हणजे वेठबिगारी. आज बहुसंख्य शेतकरी अनिघ्छेने शेती करतात. विलाज नाही म्हणून करतात. आदर्श जीवन शैली वगैरे म्हणून आपण आपली प्रतारणा करीत राहिलो. स्वामीनाथन समितीने 40 टक्के लोक नाविलाजाने शेती करतात, त्यांना संधी मिळाली तर ते लगेच शेती सोडतील. असा निष्कर्ष काढला आहे. कृषी जीवनाचे उदात्तीकरण करून अशा साहित्यिकांनी शेतकर्‍यांना शेतीत नादवून ठेवण्याचे पाप केले आहे.



कृषी ही जीवनशैली मानली की, ती परवडते का नाही, हे पाहता येत नाही. शेती हा एक व्यावसाय आहे, असे मानले तरच ती परवडते का नाही, हे पाहता येईल. शेतीकडे एक व्यावसाय म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन विकसित न होऊ देण्यात इतर घटकांसोबत अशा साहित्यिकांनी केलेले उदात्तीकरण हे एक कारण मानावे लागेल.



सवर्णांनी शेतकर्याला शूद्र मानले. चातुवर्णात शेतकर्‍यांचे स्थान ब्राह्मण, वैश्य किंवा क्षत्रिय नाही. मातीशी ज्यांचा संबंध येतो. ते सगळे शूद्र. या नात्याने शेतकरी शूद्र ठरले. महात्मा जोतिबा फुले यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड' मध्ये या बाबत स्पष्टीकरण केले आहे. शेतकत्याला अडाणी समजून अनेक विनोद रचले गेले. अनेक कादंबर्‍या मध्ये शेतकरी हे एक विनोदी पात्र बनविले आहे. हे सर्व साहित्य शेतकर्‍यांना शूद्र मानणार्यांनी लिहिले आहे.



हिंदू सवर्णांनी शेतकरी विदुषक रंगविला तसे डाव्या लोकांनी शेतकरी खलनायक रंगविला. गावचा पाटील घोड्यावर बसून रानात जातो व तेथे दिसेल त्या सुंदर मुलीवर बलात्कार करतो, अशी वर्णने डाव्या विचारांचा प्रभाव असणाऱ्या अनेक लेखकांनी केले आहे. शेतकरी मालक आहे, कारण सात-बारा त्याच्या नावाने आहे. तो मजुरांचा वर्गशत्रू आहे. अशी डावी विचारसरणी. या विचारसरणीचा पुरस्कार करणार्यांनी शेतकर्‍यांचे चित्र रंगविताना भडकपणे त्याला खलनायक रंगविले. म. जोतिबा फुले, प्रेमचंद, साने गुरुजी, बहिणाबाई आदी काही सन्मानीय अपवाद वगळले तर शेतकर्यांचे वास्तव चित्र अभावानेच रेखाटले गेले.



सर्वसाधारणपणे शेतकार्यांबाद्द्ल मनात आकस ठेवूनच लिखान झालेले दिसते. याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी, पुस्तके कोण वाचतो? कोण विकत घेतो? या प्रश्नांची उत्तरे विचारात घ्यावी लागतील. वाचणारा वर्ग शहरी आहे. बिगर शेतकरी आहे. प्रामुख्याने नोकरदार आहे. त्याला कांदा स्वस्तात हवा. कांदा महागला की तो सरकार उलथून टाकतो. त्याला साखर, दाळी वा भाजीपाला महाग झालेला चालत नाही. त्याला दुप्पट पगारी वाढवून हव्यात, मात्र शेतकार्याला भाव वाढवून मिळालेला चालत नाही. हा मुंबई-पुण्यात राहणारा वर्ग प्रामुख्याने पुस्तके वाचतो. तोच विकत घेतो. त्याला न आवडणाऱ्या पुस्तकांना तो हात लावीत नाही. पुस्तके विकली जाणार नसतील तर प्रकाशक ती कशाला छापतील? या वर्गाच्या अभिरुचीला जुळेल असेच लेखन छापले जाते. म्हणून लेखकही तशीच पुस्तके लिहितात. या वाचकांच्या पसंतीला उतरलेले पुस्तक आणि पुस्तकाचा लेखक डोक्यावर घेतला जातो. त्याला पुरस्कार मिळतात. सरकारी कमिट्या मिळतात. नाव लौकिक होतो. पैसाही मिळतो. शेतकर्‍यांबद्दल शहरी वाचकवर्गाच्या मनात एक आढी आहे. शेतकऱ्याला नायक करून लेखन केले तर शहरी वाचक त्या पुस्तकाला हात लावत नाही. म्हणून जोपर्यंत शेतकरी पुस्तकाचा ग्राहक बनत नाही, तोपर्यंत शेतकरी कधी खलनायक तर कधी विदुषक म्हणूनच चित्रित केला जाईल.



ग्रामीण साहित्य म्हणून जे काही प्रकाशित झालेले आहे, ते शेतकरी कुटुंबात बालपण गेलेल्या व पुढे नोकरी करीत असलेल्या लोकांनी लिहिलेले साहित्य आहे. त्यातही प्राध्यापक, शिक्षक अधिक आहेत. शेती सोडून नोकऱ्या करीत असलेल्या लोकांनी शेतकर्यांविषयी सहानुभूतीने लिहिलेले हे साहित्य आहे. आज ते शेतकरी नाहीत. दलित साहित्य व ग्रामीण साहित्यात हाच तफावतीचा मुद्दा आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेला माणूस नोकरदार झाला की त्याचे हितसंबंध बदलतात. मात्र दलित माणसाने गाव सोडले, व्यावसाय बदलला तरी त्याची जात बदलत नाही. काल तो ज्या जातीचा होता, तीच जात आजही चिकटलेली असते. शेतकरी कुटुंबातून आलेला प्राध्यापक आणि दलित जातीतून आलेला प्राध्यापक या मध्ये जाणिवांच्या स्तरात फरक पडलेला असतो. जात जाणिवांच्या बदलांचा वेग अत्यंत मंद असतो, आंतर जातीय विवाह केला तर काही पिढ्यानंतर फरक पडतो. मात्र एका आर्थिक गटातून दुसऱ्या आर्थिक गटात स्थलांतर करणार्यांच्या हितसंबंधीय जाणिवा मात्र चटकन बदलतात.



आदीवासींचा उठाव झाला की त्यांची गाणी होतात, दलित चळवळीत तर खूप गाणी आहेत. स्त्रीवादी चळवळीलाही गाण्याची कधी वाणवा पडली नाही. शेतकरी आंदोलनात मात्र शेतकार्यांचे गाणे तयार झाले नाही. साने गुरुजींचे ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान' हे 70-75 वर्षापूर्वी लिहिले गेलेले गाणे गावे लागे. असे का? शेतकर्यांच्या चळवळीचे गाणे का तयार होऊ शकले नाही?



विदेशातून मोगल आले, त्यांनी उत्कृष्ट साहित्याची निर्मिती केली. एके काळी ब्राह्मणांनी गाव सोडले, त्यांनीही सुंदर लेखन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘गाव सोडा' आवाहानाला प्रतिसाद देऊन दलितांनी गाव सोडले. 1960 नंतर त्यांच्या लिखानाला धार चढली. आत्मचरित्रे, नाटके, कविता, कादंबर्‍या या सर्व क्षेत्रात दलित साहित्याने आपले वेगळेपण ठसविले. बलुतेदार बाहेर पडले, त्यांनीही विपुल लेखन केले. या सर्व उदाहरणावरून एक गोष्ट सिद्ध होते की, स्थलांतर करतात ते मोठ्या प्रमाणात साहित्य तयार करतात. त्यांच्यातील प्रतिभावंतांना अनुकूलता मिळते व ते लिखान करु लागतात. शेतकार्यांना स्थलांतर करता येत नाही. ते जमिनीशी बांधले गेलेले असतात. गावात जन्मायचे, गावात जगायचे, गावातच मरायचे असा त्यांचा जीवनक्रम असतो. लेखनासाठी ‘परकाया प्रवेशाची’ क्षमता महत्वाची मानली जाते. स्थलांतर केलेल्यांना ही अनुभूती मिळते. ते अधिक सुलभपणे ‘परकाया प्रवेश' करु शकतात. शेतकर्‍यांना जमीन, गुरे आदी कामामुळे स्थलांतर करता आले नाही म्हणून शेतकरी आंदोलनात शेतकर्‍यांनी लिहिलेले साहित्य तयार होऊ शकले नाही.



कुटुंब, जात, गाव, देश या समाजशास्त्रीय कोष आहेत. या कोषातून बाहेर पडणार्यांना सर्जनाचे वातावरण मिळते. कोषांतर करणारे समुह सांस्कृतिक पातळीवर तुलनेने अधिक सक्रीय दिसतात. शेतकत्याला हे वातावरण मिळत नाही म्हणून शेतकर्‍यांचे साहित्य निर्माण झालेले नाही, असे म्हणता येईल.



प्रगत देशांकडे पाहिले तर असे लक्षात येते की, त्या देशांत शेतीवर जगणारे लोक खूप कमी आहेत. काही देशांत तर शेती करावी म्हणून प्रोत्साहन दिले जाते. आपल्या देशात शेतीवर जगणार्यांची संख्या एकेकाळी 90 टक्के होती. अलीकडे स्थलांतराचे प्रमाण वाढले असले तरी अजूनही 60-70 टक्के लोक शेतीवर जगतात. 90 च्या नंतर स्थलांतराला वेग आला आहे. शेतकरी (यात मजूरही आले) शहराकडे धाव घेत आहेत. शेतीवरचा भार कधी ना कधी कमी होणारच आहे. चार भावांपैकी तीन भाऊ इतर क्षेत्रात जातील. एक भाऊ तेवढा शेती करेल. 75 टक्के लोक शेतीच्या बाहेर पडणार आहेत. त्या काळात खेड्यांचे चित्र पार पालटून गेलेले असणार आहे. ग्रामीण साहित्याला या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. 90 च्या नंतर नवे तंत्रज्ञान आले. या तंत्रज्ञानाने सारे जग बदलून टाकले. एकदम नवी परिस्थिती निर्माण होत आहे. शेतीचा शोध लागला तेव्हा मानवी जीवनाला एक प्रकारची कलाटणी मिळाली होती. आता नव्या तंत्रज्ञानामुळे पुन्हा जग बदलांच्या उंबरठ्यावर येऊन उभा ठाकला आहे. या नव्या जगाचे प्रश्न नेमके कसे राहतील ते सांगता येणार नाही, परंतु ते आजच्या सारखे असणार नाही. हे निश्चित. हा संक्रमण काळ टिपण्याचा जो जोरकस प्रयत्न व्हायला हवा तेवढा होतांना दिसत नाही. काही ताकदीचे लेखक समोर येत आहेत. 90च्या आधीच्या लिखनाच्या तुलनेत मराठी ग्रामीण लेखक नवे लिहिण्याचा प्रयच्न करतांना दिसतात. ही आशादायक आणि दिलासादायक बाब आहे.



अमर हबीब

अंबर, हाऊसिंग सोसायटी,आम्बाजोगाई- 431517 (जि.बीड)

मो . 8411909909

habib.amar@gmail.com

Thursday, 13 October 2022

आंबाजोगाई साहित्य संमेलनाचा प्रयोग

९ वे आंबाजोगाई साहित्य संमेलन
*मसापचे अध्यक्ष अमर हबीब यांचे भाषण*
----------------------------------------------

रसिक बंधू भगिनींनो,

आंबाजोगाईला मराठीच्या आद्यकवींचा वारसा लाभला आहे. सुमारे साडे नऊशे वर्षांपूर्वी नाथपंथी संत मुकुंदराज स्वामी यांनी याच गावात 'विवेकसिंधु' या मराठीतील पहिल्या कविताग्रंथाची रचना केली. त्यांची कीर्ती दिगंत होती. तसेच दासोपंतांना 'सर्वज्ञ' म्हटले जाते. त्यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले. हा 'नवकोट नारायण' याच गावात वावरला.
जोगाईचे 'आंबे' म्हणून ओळखले जाणारे हे गाव निजाम राजवटीत असताना, स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे यांनी याच गावात राष्ट्रीय शाळा उभी केली व स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले. या लढ्याचा एक भाग म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेची सुरू करण्यात आली होती. साधू गुरुजी, राखे गुरूजी व अन्य लोक या परिषदेचे काम करीत असत. बाबासाहेब परांजपे हे मराठवाडा साहित्य परिषदेच्या एका साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यानंतर हे काम मंदावले तरी साहित्याची साधना कायम राहिली. पोस्टात नोकरी करणारे अब्दुल सलाम 'वफा' हे मराठवाडाभर ओळखले जाणारे नामवंत कवी होते. त्याच पिढीतील राम मुकद्दम हे 'रामकाका' म्हणून सर्वांना परिचित होते. रामकाकांनी या गावाला सांस्कृतिक व साहित्यिक चेहरा दिला. १९८३ साली अंबाजोगाईत ५७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. व्यंकटेश माडगूळकर अध्यक्ष होते. महाराष्ट्रभरातून साहित्यिक आले होते. या संमेलनाच्या तयारी साठी अख्खे गाव राबले होते. तरीही डॉ. व्यंकटराव डावळे, प्राचार्य भ. कि. सबनीस, भगवानराव लोमटे, डॉ. द्वारकादास लोहिया आणि राम मुकद्दम या लोकांनी केलेली धडपड अंबाजोगाईची साहित्य चळवळ कधीच विसरू शकणार नाही.

◼️अंबाजोगाई साहित्य संमेलन

अंबाजोगाई साहित्य संमेलनाला वरीलप्रमाणे वारसा लाभला आहे. १९९६ साली प्रा. रंगनाथ तिवारी, अमर हबीब, डॉ. श्रीहरी नागरगोजे व प्रा. नानासाहेब गाठाळ यांनी एका खाजगी बैठकीत साहित्य संमेलन घेण्याचा विचार केला. प्रत्येकी दोन-दोन हजार रुपये जमा केले व अंबाजोगाईचे स्थानिक साहित्य संमेलन घेण्याचे पक्के केले. डॉ. नागरगोजे यांनी जबाबदारी स्वीकारली. ते स्वागताध्यक्ष झाले. गावचे संमेलन ही कल्पनाच नवी. त्यात ठरले असे की, स्वागत सभासद नोंदवून केवळ साहित्यिक आणि रसिकांच्या पैश्यानेच संमेलन घ्यायचे. जमतील तेवढ्या पैश्यात संमेलन घेऊ, मात्र कोणाकडे देणगीसाठी हात पसरवणार नाही, रसिक साहित्यिकांना ही कल्पना पसंत पडली. भरभरून सभासद झाले. शानदार संमेलन घेता आले. हे संमेलन दरबारी म्हणजेच राजाश्रयी नाही, लोकाश्रयी राहील हे तेव्हांच ठरले होते.
    या संमेलनाचे वैशिष्ट्यच आहे की, या संमेलनासाठी देणग्या गोळा करायच्या नाहीत. सरकारी मदत तर सोडाच, धनदांडग्यांकडूनही मदत घ्यायची नाही. रसिक साहित्यिकांकडून समान रकमेचा निधी गोळा करून हे संमेलन साजरे केले जाते. दुसऱ्या भाषेत बोलायचे तर या संमेलनाचा आर्थिक कणा हा स्वाभिमानाचा आहे.
या संमेलनाचे दुसरे वैशिष्ट्य असे की, हे संमेलन गावचे आहे. गावात विविध भाषा बोलल्या जातात. विविध भाषांमधून साहित्य निर्माण होते. 'सृजन' ही मूळ बाब आहे. भाषा हे माध्यम आहे. गावचे साहित्य संमेलन असल्यामुळे अन्य भाषांसाठी या संमेलनाने आपले द्वार खुले ठेवले. त्यामुळे काही उर्दू कवी यात सहभागी झाले. विविधतेतून एकता ही भावना रुजवायची असेल तर अशी संमेलने निश्चित उपयोगी ठरतात. मराठी भाषिकांचा सहभाग मोठा असणे स्वाभाविक आहे. भाषा भगिणींनी एकमेकांच्या हातात हात घालून गावच्या संस्कृतीचे संवर्धन करावे, अशी त्या मागची भूमिका आहे.

◼️अध्यक्षांच्या निवडीची पद्धत

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मोठे वाद होतात. यावर आम्ही एक तोडगा काढला आहे. तेच या संमेलनाचे तिसरे वैशिष्ट्य आहे. मावळत्या अध्यक्षाने नव्या अध्यक्षाचे नाव प्रास्तावित करायचे. ते नाव मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीला सर्वमान्य असेल तर ते नाव जाहीर करायचे. जर कार्यकारिणीत एकमत झाले नाही तर कार्यकारिणीने निर्वाचन अधिकारी नेमायचा. रीतसर निवडणूक घ्यायची. म.सा.प.चे आजीव सदस्य व स्वागत सभासद हे मतदार राहतील. त्यांनी नवा अध्यक्ष निवडायचा.
          पहिला अध्यक्ष निवडताना निवडणुकीची वेळ आली होती. प्रा. रंगनाथ तिवारी आणि ए.मा. कुलकर्णी अर्थात एकनाथराव गुरूजी असे दोन उमेदवार होते. परंतु एकनाथराव गुरुजींनी सांगितले की, 'मी नुसता वाचक आहे. रसिक आहे. मी साहित्यिक नाही. तिवारी लेखन करतात त्यांचा अध्यक्षपदावर अधिकार आहे.' असे सांगून गुरूजींनी माघार घेतली व तिवारी सर बिनविरोध निवडून आले. या घटनेने एक मापदंड घालून दिला. जो साहित्यिक आहे तोच या संमेलनाचा अध्यक्ष होऊ शकतो. इतर कोणी नाही. त्यानंतर मात्र या नऊव्या संमेलनापर्यंत कधीही निवडणुकीची वेळ आली नाही. पहिले अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी यांनी डॉ. शैला लोहिया यांचे नाव सुचविले, त्यनंतर डॉ. शैला लोहिया यांनी प्रा. रा. द. अरगडे, प्रा. अरगडे यांनी बलभीम तरकसे, बलभीम तरकसे यांनी डॉ. संतोष मुळावकर यांचे नाव सुचविले. डॉ. मुळावकर यांचे नुतन अध्यक्षांचे नाव सुचविण्या आधीच निधन झाले. तेव्हा हयात असलेल्या सर्व माजी अध्यक्षांकडून नावे मागविली व त्यातून डॉ. श्रीहरी नागरगोजे यांच्या नावाला मसाप कार्यकारिणीने मान्यता दिली. डॉ. नागरगोजे यांनी मंदाताई देशमुख यांचे नाव सुचविले. मंदाताईंनी गणपत व्यास यांचे व गणपत व्यास यांनी प्रचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांचे नाव सुचविले. निवडणुका टाळूनही सकस लोकशाही परंपरा जपता येते, याचा वस्तुपाठ या अनुभवातून मिळाला.
       कोणत्याही साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणाला विशेष महत्त्व असते. अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या सर्व अध्यक्षांची भाषणे या गावाच्या वाटचालीचे मार्मिक विश्लेषण करतात. पाचव्या संमेलनात ती एकत्र प्रकाशित करण्यात आली. दर पाच वर्षांनी ती एकत्र छापली जावी अशी अपेक्षा आहे.
       अंबाजोगाई साहित्य संमेलन हा अंबाजोगाईचा महोत्सव आहे. तो जरी दोन दिवस भरत असला तरी
त्याचा माहोल दोन महीन्या आधीच सुरू होतो. वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. तसेच वेगवेळी संकलने
प्रकाशित केली जातात. २०१० साली, चौथ्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने "दीपमाळ" या नावाने आम्ही अंबाजोगाईच्या कवींचा प्रातिनिधिक कविता संग्रह प्रकाशित केला. आद्यकवी श्री मुकुंदराज स्वामी पासून आज पर्यंतच्या विविध भाषांतील सुमारे सव्वाशे कवितांचा त्यात समावेश करण्यात आला. अंबाजोगाईच्या कवितांचा हा दस्तावेज महत्वाचा आहे. तसेच यंदा म्हणजे ९ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आम्ही "जयवंती" या नावाचा प्रातिनिधिक कथा संग्रह प्रकाशित करीत आहोत. यात १९ कथांचा समावेश आहे.
संमेलनातील विषय आणि संमेलनातील सहभाग या दोन्ही बाबतीत स्थानिकता जपण्यात येते. हे अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे चौथे वैशिष्ट्य आहे. 'अंबाजोगाईतील साहित्य' या विषयावर परिसंवाद झाले. त्या निमित्ताने भरपूर माहिती संकलित झाली. स्थानिक संमेलनाचा सर्वात मोठा फायदा हाच आहे की, त्या निमित्ताने माहितीचे संकलन केले जाते. अंबाजोगाईचे बाल साहित्य, महिलांचे साहित्य, उर्दू साहित्य असे अनेक विषय हाताळले आहेत. या ९ व्या साहित्य संमेलनात आपण 'जेष्टांचे साहित्य' या विषयावर बोलत आहोत.
       गावातील लेखक कवींना या निमित्ताने व्यासपीठ मिळते. नव्या प्रतिभावंतांची गावाला ओळख होते, तसेच या प्रतिभावंतांना मिळालेला प्रतिसाद जोखता येतो. संमेलनाच्या निमित्ताने जे विविध उपक्रम घेतले जातात ते फार महत्त्वाचे असतात. कधी अंबाजोगाईच्या साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन केले जाते, तर कधी 'कवी आपल्या शाळेत' असा उपक्रम राबविला जातो. विविध वाङमय् प्रकाराच्या स्पर्धा घेण्यात येतात. शाळकरी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळावा म्हणून भिंतीपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात आपण "कलादालन" भरवले आहे. त्यात "जेष्टांसोबत सेल्फी" हा नवा उपक्रम करीत आहोत. 

◼️जेष्ट नागरिक संघ
 
मागच्या संमेलनापासून आम्ही गावातील प्रातिनिधिक संस्था, संघटनांना यजमानपद देण्याचे ठरवले. वकील संघाचे अध्यक्ष ऍड. शरद लोमटे हे मागच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. यंदा जेष्ट नागरिक संघाने ही जबाबदारी स्वीकरली. आंबाजोगाईचा जेष्ठ नागरिक संघ मोठा आहे. पाचशे हून अधिक सभासद आहेत. सातत्याने वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. या संघाची दखल राज्यच नव्हे राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. या संघाचे सर्व पदाधिकारी मोठे उत्साही आहेत. त्यांच्या प्रयत्नातून हे संमेलन साकार होत आहे. अर्थात मराठावाडा साहित्य परिषदेच्या कार्यकरिणीने देखील तेवढ्याच उत्साहात त्यांना साथ दिली आहे. 

◼️पहिल्या महिला स्वागताध्यक्ष

प्रत्येक साहित्य संमेलनाला एक स्वाताध्यक्ष निवडला जातो. खरे तर त्यांनी १०० स्वागत सभासद नोंदवल्यानंतर स्वागत सदस्य आणि म.सा.प.चे आजीव सदस्य यांची संयुक्त बैठक घेऊन स्वागताध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब करावे, असे अपेक्षित असते. परंतु स्वागताध्यक्षांच्या नावाची घोषणा होताच त्याला आपोआप मान्यता मिळत असल्यामुळे ही औपचारिकता सहसा पाळली जात नाही. आतापर्यंत आठ संमेलने झाली. हे नऊवे संमेलन आहे. डॉ. श्रीहरी नागरगोजे हे पहिल्या व दुसऱ्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राहिले. त्यानंतर श्री. दगडू लोमटे, श्री. विद्याधर पांडे, श्री. एस. बी. सय्यद, डॉ. श्री. राहूल धाकडे, श्री. संतोष माहिते, ऍड. श्री. शरद लोमटे यांनी समर्थपणे ही जबाबदारी पार पाडली. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एक महीला ही धुरा सांभाळीत आहे. सौ. कमलताई गोविंदराव बरुळे या जेष्ट नागरिक संघाच्या वरिष्ट पदाधिकारी आहेत. या संघाच्या वतीने त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत. विशेषतः महिलांची सक्रीयता वाढवण्यात त्यांचा वाटा महत्वपूर्ण आहे. अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या त्या पहिल्या महिला स्वागताध्यक्ष झाल्या, याचा आम्हाला मनापासून आनंद होत आहे. घरातच म्हणून नाही तर समाजात देखील संस्कृतिक जाणिवांचे संवर्धन स्त्रीच करीत असते. एका कुटुंबातून निघून दुसऱ्या कुटुंबात रुजण्याचा अनुभव असल्यामुळे स्त्रीयांना परकाया प्रवेशाचे कसब सहज अवगत होत असते. ९ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या या रोपट्याला एका महिला स्वागताध्यक्ष लाभली, एवढेच नव्हे तर त्यांनी हे संमेलन मूर्त करून दाखविले. "करके दिखाया" ही बाब या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे. 

◼️संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे

आंबाजोगाई या गावच्या भूमीत असे काही आहे की, यात बाहेरगावाहून आलेले प्रतिभावंत सहजपणे रुजतात. ते बहरतात. आणि आपली रसाळ फळे गावकऱ्यांना भरभरून देतात. डॉ. कमलाकर कांबळे त्यापैकीच एक आहेत. ते उमरग्याकडून येथे आले व अंबाजोगाईचे झाले. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहातील त्यांचा सहभाग न विसरण्यासारखाच आहे. मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांची कामगिरी उत्तम राहिली. नंतर ते येथील खोलेश्वर महाविद्यालयात प्राचार्य राहिले. दलित साहित्य समिक्षेवर त्यांचा अधिकार आहे. जातक कथांच्या बाबतीत त्यांनी लेखन केले आहे. बौद्ध साहित्य संमेलन त्यांनी सुरु केले. ते आजही होतात. ते मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य आहेत. विद्यापीठ विधी सभेवर नुसते आहेत असे नाही तर आद्यकवी मुकुंदराज अध्यासन सुरु करण्यात त्याचा वाटा मोठा आहे. त्याच बरोबर आंबाजोगाई येथे मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे ही मागणीही त्यांनी लावून धरली आहे. साहित्य आणि साहित्य चळवळ या दोन्ही गोष्टीत सक्रीय असलेले कमलाकर कांबळे हे या संमेलनाचे अध्यक्ष झाले ही बाब भुषणावह आहे.

जेष्ट नागरिकांवर झोत असणारे बहुदा हे पहिलेच साहित्य संमेलन असावे असायला याही संमेलनात सगळेच विषय आहेत, कथा कथन, कवी संमेलन, परिसंवाद आदी. परंतु या सर्वांत जेष्ट नागरिकांचा एक सोज्वळ रंग दिसून येतो. परिसंवादांचे विषय मुद्दाम जेष्ट नागरिकांशी निगडीत ठेवले आहेत. आंबाजोगाईतील जेष्टांचे साहित्य आणि साहित्यातील जेष्ट. मला वाटत नाही की, कधी कोणत्या साहित्य संमेलनात असा विषय आला असेल. या संमेलनात महिलांचा सहभाग उल्लेखनीय म्हणावा लागेल. निमंत्रितांच्या कवी संमेलनात २३ पैकी बारा महिला आहेत. कोणतेही असे सत्र नाही ज्या सत्रात महिलांचा सहभाग नाही. सूत्रसंचालक व संयोजकांपैकी देखील अनेक महिला आहेत. जेष्ट नागरिक आणि महिलांचा सहभाग या दोन गोष्टी या संमेलनाची वेगळी ओळख करून देतात. असे असले तरी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी अमृत महाजन, गोरख शेंद्रे, वैजनाथ शेंगुळे, सागर कुलकर्णी, डॉ. राहुल धाकडे, मुजीब काजी, अनिता कांबळे, रेखा देशमुख, डॉ. राजेश इंगोले, विष्णू कावळे, भागवत मसने, संतोष मोहिते, अनिकेत डिघोळकर, आदी तरूणांची धडपड वाखाणन्या सारखी आहे. ही तरूण मंडळी आंबाजोगाईच्या साहित्य चळवळीला पुढे नेईल असा मला विश्वास वाटतो.

या संमेलनाचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे देखील अंबाजोगाईशी निगडीत असलेले असतात. हे या संमेलनाचे पाचवे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. डॉ. अरूण डावळे यांचे बालपण अंबाजोगाईत गेले. त्यांचे वडील डॉ. व्यंकटराव डावळे यांनी या गावात ५७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतले होते. एवढेच नव्हे तर अंबाजोगाईचे वैद्यकीय महाविद्यालय हे त्यांचे जागते स्मारक आहे. भगवानराव बप्पा म्हणजे आंबाजोगाईचा सर्वार्थाने विश्वकोष आहे. बप्पांसारख्या लोकांनी अंबाजोगाईचा पिंड घडवला आहे. समारोप सत्रात आपण त्यांचे ऐकणार आहोत.

या दोन दिवसाच्या सोहळ्यात आपण सर्व सहभागी होत असल्याबद्दल डॉ. कमलाकर कांबळे, डॉ. अरूण डावळे, भगवानराव बप्पा शिंदे यांचे व आपले मनःपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद !

*अमर हबीब*
अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद, आंबाजोगाई 
दि. १६ ऑक्टोबर २०२१